Monday, 20 July 2020

दिवाळीचा किल्ला

कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र ...... सकाळी ७ वाजताचा गजर नेहमीप्रमाणे धडाडला ... प्रतीक डोळे चोळत चोळत उठायचा प्रयत्न करत होता .... इतक्यात आईने हाक मारली .... "उठलास का रे प्रतीक ... आज Geometry चा  पेपर आहे ना .... चाल आवर पटापटा ... एखादी रिव्हिजिन होईल पटकन" .....

Geometry म्हणल्यावर प्रतिक ची झोप एकदम उडाली. आज Geometry ! उद्या चित्रकला आणि कार्यानुभव झाले कि मग परीक्षा संपलीच ..... दिवाळी ची सुट्टी सुरु ..... आणि यावर्षी प्रतीक आणि त्याच्या सोसायटी मधल्या सगळ्या मित्रांनी मिळून एक नाही तर दिवाळीचे दोन किल्ले बनवायचे ठरवले होते .... एक तर राजगड आणि दुसरा .... दुसरा काय ठरत नव्हता ... पण जाऊदे आधी परीक्षा तर संपूदे ....


Geometry चा पेपर झाला ! चित्रकलेला तसाही कोण अभ्यास करत नाही पण उगाच खाली जायचा हट्ट केला तर आईकडून ऐकून घ्यावे लागेल म्हणून प्रतीक घरीच थांबला. चित्रकला आणि कार्यानुभव कसेबसे संपवले आणि जो घरी निघाला तो शाळेच्या सर आणि मॅडम ना हॅपी दिवाली वैगेरे म्हणायला पण थांबला नाही ...

घरी आला तोच प्रतीकला छान काहीतरी तळण्या चा वास आला. त्याला ओळखायला फार वेळ लागला नाही कि आपल्याच घरी आज चकल्यांचा बेत आहे. चकल्यांच्या दोन बरण्या भरून टेबल वर ठेवल्या होत्या. त्यातल्या एका बरणीत हात घालून हाताला लागतील तेवढ्या चकल्या त्याने काढून घेतल्या आणि पळाला ते थेट कपडे बदलायला. कारण खाली अमेय, श्रुती आणि मोहित त्याची वाट पाहत होते. आज महत्वाची मीटिंग होती. कारण आज किल्ल्याच प्लांनिंग करायचा होतं !

सगळ्यात महत्वाचा म्हणजे किल्ल्यासाठी जागा. मागच्या वेळी B बिल्डिंग च्या पुढे बनवला आणि जोगळेकर काकूंनी एव्हडा दंगा केला. काय तर म्हणे कि त्यांच्या मुलाने नवीन गाडी घेतली आणि तिथे लावायची होती. दंग्याच्या दुसऱ्या दिवशी किल्ल्याची थोडी पडझड झाली होती, नवीन गाडी धडकली असणार बहुदा. म्हणून यंद्याच्या किल्ल्याची जागा आजच्या आज ठरवायची होती. रोहन म्हणत होता कि D बिल्डिंग च्या पलीकडे नवीन बिल्डिंग चा काम चाललंय, तिथून थोडी माती, वाळू आणि दगड वैगेरे मिळू शकतील. पण तिथे कोणी अडवायला नको फक्त. बाकी माती लिंपायला एखादा पोतं तर घरातूनच मिळेल ...

A आणि B बिल्डिंग च्या मध्ये थोडा मागे एक जागा प्रतीक ने हेरून ठेवली होती. एक काय पण दोन छान मोठे मोठे किल्ले आरामात होतील अशी जागा होती ती. प्रतीक च्या मनात सहज विचार आला - शिवाजी महाराज पण अशीच शोधात असतील का जागा किल्यांसाठी. स्वतःशीस हसून प्रतीक पटकन A बिल्डिंग च्या जोशी काकांच्या घरी झेपावला, कारण ती जागा त्यांच्या पार्किंग ची होती. त्यांचीच परमिशन तर काढायला पाहिजेच ना ....


कालचा प्लॅन तरी पूर्ण झाला, जागा सापडली होती .... आज शनिवार, म्हणजे बजरंग बली कि जय म्हणायचं आणि आज माती, वाळू आणि दगड गोळा करायचेच होते. सकाळी सकाळी गरमागरम इडल्या खाऊन प्रतीक खाली आला आणि सायकल बाहेर काढली. अजून उन्मेष आणि रघु पण सायकल आणणार होते. आज त्या बिल्डिंग च काम बघणाऱ्या काकांना मस्का मारायचा होता. सगळ्यांना जरा टेन्शन होत पण काका तर भारीच निघाले ... माती, वाळू तर दिलेच पण सोबत १० विटा पण दिल्या ... किल्ल्याच्या तटबंदीची सोय झाली होती ......

दगड रचले, पोत्यावर माती लिंपली, ओली आहे तोपर्यंतच पटकन पोतं  पसरून टाकायला जरा गडबडच झाली ... पण सगळं जमलं नीट ... एकदा जरा माती सुकली कि संध्यकाळी एक चक्कर टाकू असा म्हणून सगळे परत घरी गेले ... संध्यकाळी उन्मेष आठवणीने हळीव घेऊन आला होता. आज बिया टाकल्या कि परवा म्हणजे छोटी छोटी पानं आलीच म्हणून समजा ....


रविवारी किल्ल्याच्या डेकोरेशन चा काम सुरु झालं. श्रुती चा ड्रॉयिंग चांगलं म्हणून मातीच्या रंगाचे बुरुज पेपर वर काढून पुठ्य्या वर चिकटवून आणायचं काम तिचं. रघु कडे बऱ्यापैकी मावळे चित्रं होती, शिवाजी महाराज तर अगदी सुरेखच ! प्रतीकला नेहमी हसू  यायचं ते मावळे बघून,  ससा आणि त्याच्या बाजूचा मावळा एकाच आकाराचे कसे काय असू शकतात, तीच गोष्ट किल्ला उतरणारी हिरकणी आणि जवळच्या जंगलात असणाऱ्या वाघाची !

उन्मेष आणि रोहन तटबंदीच्या कामात लागले होते. थोडा हलका खड्डा खणला, किल्ल्याच्या बाजूबाजूने, ते झाले खंदक, त्याच्या आतल्या बाजूला विटा लावून केलेली तटबंदी. विटांना माती थापलेली जेणे जेणे करून एक्दम मजबूत भिंतीसारखंच वाटेल. एक एक गोष्ट चढली किल्ल्या वर तसा  किल्ल्याचा दिमाख ओळखू येऊ लागला ... आज काही करून किल्ला पूर्ण करायचा होता .... सोमवारी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी किल्ल्यावर पणती लावून एक तरी लवंगीची माळ उडायाचीच होती समोर ......


नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी होतं, त्यामुळे सगळ्या मुलांना घरीच कामं नेमून दिली होती, कुणी हार करत होता, कुणी रांगोळी काढत होते, कुणी आंब्याची पानं आणायला बाहेर पडले होते तर कुणी घरातल्या पूजेची मांडामांड करण्यात मदत करत होते. लक्ष्मी पूजन झालं आणि मग काय मुलांना कळ निघेना. सगळ्यांना कधी एकदा आई बाबा खाली येऊन आपला किल्ला बघायतात असा झालं होतं .... आपल्या मुलांनी मेहेनतीने केलेला किल्ला बघायला सगळे आई बाबा पण आतुर होतेच ...

"राजगड" - किल्ल्यावर लावलेला तो बोर्ड अगदी दिमाखात किल्ल्याची ओळख करून देत होता. हळिवाची शेती किल्ल्याच्या दऱ्यांवर पसरली होती. मावळे अतिशय हुशारीने गस्त घालत होते. किल्ल्याच्या बुरुजावर चोहो दिशांना सलामी देणाऱ्या तोफा कधीही उसळायला तयार होत्या. एका गुहेमध्ये रामदास स्वामी आसनस्थ झाले होते. स्वराज्याच्या पुढच्या मोहिमाना जणू आशीर्वाद देत होते ...
तटबंदीच्या आतमध्ये किल्ल्याच्या पायथ्यशी एक छोटे गाव वसले होते, गावात चार दोन घरं होती. एका घराच्या बाजूला एक विहीर होती. गावापासून थोडा लांब गर्द झाडांच्या मध्ये एक ससा खेळात होता. त्या सशाच्या थोडं वरतीच हिरकणी आपल्या पिल्ल्याला भेटायच्या निर्धारानं त्या कड्यावरून उतरत होती ...
तटबंदी वर पणत्या लावल्या होत्या, ज्याच्या प्रकाशात मावळे टेहेळणी करत होते. किल्ल्याच्या प्रवेश द्वारापाशी दोन तोफा, "काली" आणि  "भवानी", येणाऱ्या शत्रूला स्वराज्याचं पाणी पाजायला एकदम तयार होत्या ....
भरपूर पणत्या लावल्यामुळे किल्ल्यावर पण एकदम दिवाळीची शोभा पसरली होती. शिवछत्रपति अगदी जणू राज्याभिषेकासाठी तयार झाले होते. सेनापती आणि प्रधान अश्या मोजक्या मंडळींसह पुढच्या योजनांचा आराखडा बांधत होते. आता कोणत्याही क्षणी "हर हर महादेव" चा पुकारा होईल आणि हजारो मावळे तीच गर्जना आसमंतापर्यंत पोहोचवतील असे वाटत होते ...


दृष्ट लागेल असा किल्ला बघून सगळ्या आई बाबाना भरून आला होतं ... प्रतीकांच्या बाबांच्या डोळ्यात क्षणभर आनंदाश्रू तरळले ... त्यांना या सगळ्या वानर सेनेचा अभिमान वाटत होता .... रस्त्यावर चौकाचौकात विकायला बसलेल्या, काळ्या रंगात रंगवून त्यावर चमकी पसरलेल्या, आखीव रेखीव पायऱ्या असलेल्या आणि काही शे रुपयांना विकत मिळणाऱ्या त्या निर्जीव किल्ल्याला मुलांनी साकारलेल्या या राजगड किल्ल्याच्या नखाची देखील सर नव्हती .....


Thursday, 30 August 2018

माझी आजी !

अच्छे काम के पहले कुछ मीठा हो जाये चा ज़माना आहे आजचा. त्यामुळे माझ्या या मराठी प्रकरणाची सुरुवात पण काहीतरी गोड लिहून करावी असे वाटले। नुकताच माझ्या आजीचा सहस्रचंद्रदर्शन चा सोहळा पार पडला अणि तिथे मी माझ्या अल्प मतिप्रमाणे अभिप्राय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। गोडा बरोबर कनेक्शन असं की लहानपणी पासूनच प्रत्येकाने आजीच्या हातचे गोड पदार्थ ताव मारून खाल्लेले आहेत। तर अश्या गोड आठवणींना उजाला देणाऱ्या आजीच्या सहवासाबद्दल माझे हे चार शब्द, बघा कसे वाटतात, अभिप्राय नक्की कळवा ..... 


गणपतीचे स्मरण करतो आणि सर्वाना नमस्कार करतो.
माझे ना दरवर्षी असे होते, जून महिन्याचे पान फिरवून कॅलेंडर मध्ये जुलै महिन्याचे पान दिसले कि २९ जुलै ची तारीख दिसते आणि मनात नेहमीच घर करून असणारी अप्पांची आठवण एक्दम मूर्त स्वरूप धारण करते. वास्तविक २९ जुलै हा अप्पांचा पुण्य स्मरण दिवस, पण त्या दिवशी त्यांच्या आपल्यात नसण्याबद्दल जेवढा वाईट वाटतं त्यापेक्षा जास्त अभिमान या गोष्टीचा वाटतो कि ते माझे आजोबा आहेत. पण अप्पांची एकट्याची आठवण येणं शक्यच नाही, कारण जिथं जिथं अप्पा तिथं तिथं अनुआजी आहेच.

आजी, काय रसायनं असतं हो हे आजी म्हणजे. इतिहासने आई या पात्राला खूप मोठा केलंय, पण आजीला मात्र फार कमी वेळा आठवलं गेलंय. जिजाबाई शिवाजी राजांची आई म्हणून लोकांना माहित आहेत पण स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजांची आजी म्हणून खूप कमी लोक ओळखतात. राजकारणाचे जे धडे नानासाहेब पेशव्यांना त्यांचे वडील बाजीराव पेशव्यांच्यांकडून मिळाले त्याच तोलामोलाचे धडे त्यांना त्यांच्या आजी राधाबाई यांच्याकडून मिळाले. अर्थात, देशाची पहिली महिला पंत प्रधान, इंदिरा गांधी, आजी म्हणून फार कधी प्रभावी नातवंडं घडवू शकल्या नाहीत हि गोष्ट वेगळी.
तर मुद्दा काय, आजीला थोडा फुटेज कमीच मिळालेलं आहे.

अनु आजी बाबत थोडं असाच काही आहे, आज माझ्या पिढीसाठी एक प्रेमळ आजी म्हणून आणि माझ्या आई बाबांच्या पिढी साठी तितकीच प्रभावी आणि कणखर, आई, मामी, काकू आणि आत्या म्हणून अनु आजी आपल्या सगळ्यांना आधार देत आली आहे. पण पाश्चात्य संस्कृती सारखं कुठला तरी एक दिवस काढून आणि त्याला ग्रँड Mothers डे असा म्हणून त्या दिवशीच थँक यु म्हणणं आपल्याला जमणार नाही. कारण आपल्या mothers आणि grand mothers यांचं कामच एव्हडं मोठा आहे. एक संपूर्ण पिढी घडवणं आणि त्यांच्या संस्काराचा पाया पक्का करून घेणं हे काही येऱ्या-गबाळ्याचं काम नाही.

अनु आजी कडून मी बरंच काही शिकत आलोय आणि या पुढेही शिकत राहीन. पण तिचा एक गुण जो सगळ्यांनी अतिशय आत्मसात करण्यासारखा आहे तो म्हणजे - शांतता आणि स्थिरता. वरपांगी थोडा सोपा वाटणारा हा स्वभाव दररोज आचरणात असणे हि कठीण गोष्ट आहे. आज पर्यंत मी तिला एकदाही चिडलेलं पहिला नाही कारण अत्त्यंत स्थिर असाच तिचा स्थायी भाव आहे. दुसरा महत्वाचा गुण म्हणजे कुठल्याही परिस्थितीचा सर्व बाजूनी विचार करून मगच त्याबाबत काही हालचाल करणे. याला थोडी तिची कर्क राशी कारणीभूत असणार बहुदा, यामुळे तिला कदाचित एखादा decision घायला थोडा जास्त वेळ लागेल पण तो सारासार निर्णय असणार यात शंका नाही.

अजून एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आमच्या पिढीचं थोडं नुकसान असा होणार आहे ना कि आम्हाला आपली जी शास्त्र पुराण आणि ग्रंथ आहेत त्यांना समजून घेण्यात योग्य मार्गदर्शन मिळणं खूप  कठीण आहे. आणि याच बाबतीत अनु आजीचा अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे तिचा आपल्या पुराणांबाबतचा सखोल अभ्यास. आणि तिचा हा अभ्यास एखादं पुस्तक वाचून किंवा काही कोर्सेस करून बनलेला नाही तर तिने सातत्याने केलेल्या उपासनेच्या पायावर तो बनलेला आहे. हे तिचं परम भाग्य म्हणावं लागेल कि तिला भागवत सप्ताह आणि दासबोध, ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह अटेंड करता आले आहेत.

माझ्या वाचनात एकदा खूप चांगला लेख आला होता. त्याचा सार असा होता कि - आत्ता पर्यंत या पृथ्वीवर ४ युगं झाली आहेत, आणि चांगलं आणि वाईट यांची लढाई प्रत्येक युगात होत आली आहे. सत्य युगं मध्ये हि लढाई देव आणि दानव यांच्यात झाली - देव स्वर्गात होते आणि दानव पाताळ मध्ये. म्हणजे त्यांच्यात खूप जास्त अंतर होतं. हेच त्रेता युगात राम आणि रावण पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात होते. द्वापार युगात महाभारतात हेच चांगलं वाईट युद्ध एक घरात भावाभावांमध्ये झालं. आणि आजच्या काली युगात हेच  दानव  आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. त्यामुळं आजचं युद्ध ये प्रत्येचा स्वतःशीच आहे. तर मग या अवघड अशा द्वंद्वा मध्ये, जिथे आपलेच नेगेटिव्ह  विचार आपल्याला त्रास देतात, त्यामुळे निर्णय घेणे अवघड होऊन बसते, आपण जिंकणार कसे.  मला तरी एक सोपा उपाय सापडलाय. माझ्या मते जेव्हा  जेव्हा माझ्या मनात असे द्वंद्वा चालेल, तेव्हा तेव्हा मी असा विचार करावा कि आज अप्पा असते तर त्यांनी मला काय सल्ला दिला असता आणि जर मी माझ्या मनाची स्थिती जर आजीला सांगितली तर ती मला काय सांगेल आणि काय निर्णय घेऊ देईल. अप्पा आणि आजीचे हेच उपदेश जर मी ऐकत राहिलो तर या द्वंदात मी कायमच जिंकत राहेन.

अनु आजी, तू ग्रेट आहेस ! तुला खूप उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो, आम्हाला कायमच हवाहवासा वाटणारा तुझा सहवास आम्हा मुलाबाळांना, नातवंडांना आणि आता तर परतवंडानाही कायम लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.



दिवाळीचा किल्ला

कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र ...... सकाळी ७ वाजताचा गजर नेहमीप्रमाणे धडाडला ... प्रतीक डोळे चोळत चोळत उठायचा प्रयत्न करत होता .... इतक्यात आईन...